Sunday, May 1, 2011

मराठी मराठी मराठी.......

मराठी, मराठी माणूस आणि महाराष्ट्र....
         आजकालचा Hot topic, अक्षरशः ज्वलंत विषय!
काय काय चालतं या विषयाच्या विजावर, देवच जाणे! मग कोण आहे हा मराठी माणूस? जो महाराष्ट्रात राहतो तो?  जो महाराष्ट्रात जन्मला तो? जो इथली माती आपली मानतो तो? जो महाराष्ट्रच देण लागतो तो? की जो "जय भवानी" म्हणाल्यावर "जय शिवाजी" म्हणाल्याशिवाय राहत नाही तो?
          अरे, हे सर्व महाराष्ट्रीय. हे सगळे महाराष्ट्राला मानतात, पण जोवर हे मराठीत बोलत नाहीत तोवर हे मराठी नाहीत! खरा मराठी तोच जो चारचौघात न घाबरता, न बुजता, ताठ मानेने, अभिमानाने "अमृताहूनही पैजा जिंके" या  ज्ञानेश्वरांच्या शब्दांचा गर्व बाळगून मराठी बोलतो; आणि स्वतःला फक्त महाराष्ट्राचाच नाही तर या देशाचा ॠणी मानतो...
 शिवरायांचे,
“ भाषा गेली की स्वाभिमान गेला,
स्वाभिमान गेला की धर्म गेला,
धर्म गेला की राज्य गेले,
आणि राज्य गेले की स्वातंत्र्य गेले!”
हा उपदेश ध्यानी ठेऊन मराठीपण जागवायला आणि वाढवायला कधीही पुढे सरसावतो.
            आपण भारतीय अत्यंत गतवैभवशाली आहोत, मराठी माणूसही काही त्याला अपवाद नाही; उलट त्यातही थोडा पुढेच आहे.मराठी माणूस  कायमच देशासाठी, स्वकीयांसाठीच नव्हे तर उचित गोष्टींसाठी लढला वेळोवेळी मोडला पण पुन्हा ठाम उभा राहिला तो "सत्य आणि उचित गोष्टींसाठीच, धर्मसाठी... "
          शिवराय हे अवघ्या मराठी जनांचे आराध्य  दैवतच. शिवराय हे मराठी माणसाच्या हृदयाच्या इतक्या जवळ आहेत की आपण त्यांना कधीकधी आप्तेष्टानं सारखे एकेरी संबोधतो,''शिवाजी होता म्हणून, शिवाजी या गडावरून त्या गडावर गेला" असा म्हणतो. हा माज नाही, हे प्रेम आहे. आपण आईला नाहीका एकेरी हाक मारत?
पण एवढे काय केले त्यांनी? याच शिवरायांनी  "मराठी माणूस" ही व्याख्या बनवली. अविरत, उत्तुंग अशी पूर्वापार आलेली पण विखुरलेली तत्वे एकत्र सांधली आणि शुन्यातून स्वर्ग निर्माण केला. पहिला मराठी शब्दकोश  बनवला आणि मराठीला राजाश्रय दिला. त्यांनी दिलेल्या पाऊल खुणांमुळेच देशासाठी मारणारा प्रत्येकजण भारतीयाच असला तरी पहिला मराठीच होता.
आद्यक्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके,आझाद हिंद सेनेत भारती होणारे जपानमधील मराठी रेजिमेंटचे सैनिक,स्वातंत्र्यानंतर लगेचच पाकिस्तानी घुसखोरांना तुटपुंज्या
सैन्यासह अडवून धरणारे कर्नल शिंदे.... सर्व  मराठीच होते. एवढेच नव्हे तर अगदी मध्ययुगात जेव्हा सुलतान अब्दालीने पुन्हापुन्हा आक्रमणे करून संपूर्ण भारताला त्रस्त करून ठेवले होते तेव्हा पानिपतावर याच मराठीतील दीड लाख बांगडी फुटली, हिऱ्या-मोत्यासारखे असीम योद्ध्ये गेले ते  या देशासाठीच. मराठे युद्धही हरले पण सुलतानाच्या फौजांचे कंबरडे असे मोडले की तो सुलतानही या शौर्याने दिपून गेला, नतमस्तक झाला आणि पुन्हा कधी भारताकडे वाकड्या नजरेने बघितले नाही. पण एवढ्यावरच हार मानून किंवा निराश होवून मराठी डगमगला नाही, तर आपले सर्वस्व गमावलेले असतानाही नव्या हिमतीने, नव्या नेतृत्वासह मोठ्या जोमाने त्याने तयारी केली आणि पुन्हा अख्खा हिंदुस्तान अगदी अफगाणिस्थानातील अटकेपासून परत आपल्या ताब्यात घेतला आणि सर्वप्रथम भारत एकछत्री अंमलाखाली आणला, अगदी काश्मीरसह.( इंग्रजांनी नव्हे!)
        तर असा हा दृढनिश्चयी  लढवय्या मराठी माणूस...मराठी माणसाच्या कातृत्वाचे तेज फक्त रणांगणापर्यंत मर्यादित नाही, तर आज प्रत्येक महत्वाच्या  क्षेत्रात त्याने बाजी मारली आहे. ज्ञानाच्या क्षेत्रात मराठी जनांनी कायमच भरभरून योगदान दिले आहे. अगदी बाराव्या शतकात ज्ञानेश्वारनी अवघ्या सोळाव्या वर्षी अनंत काळाचे सत्य व व्यवहारज्ञान सर्वसमान्यांसाठी सोप्या शब्दात मांडले.एकोणीसाव्या शतकात टिळकांनी पुन्हा याच गीतेचा आधुनिक यथार्थ अर्थ लावला. अशी किती उदाहरणे द्यावी तितकी कमीच आहेत. साहित्य , कला , विज्ञान, क्रीडा यासारखी क्षेत्रे स्वातंत्रसूर्य वीर सावरकर , सूरसम्राज्ञी लतादीदी, स्वरश्रेष्ठ भीमसेन जोशी, दादासाहेब फाळके, पु.ल.देशपांडे, आचार्य अत्रे, जयंत नारळीकर, सचिन तेंडुलकर अशा अनेक दिग्गजांनीगाजवली आहेत आणि ही नामावली वाढतच जाणारी आहे.
          मग असा हा अष्टपैलू, सर्वक्षेत्रे पादाक्रांत केलेला मराठी माणूस वादातीत का? का कधीकधी या मराठी माणसाला नाझी वृत्तीची ओढ वाटू लागते? का इतरांना तो आपल्याच माणसांचे पाय खेचताना दिसतो? का काही मराठी नेते आपल्या धडाडीच्या नेतृत्वाने मराठी माणसाची छाती अभिमानाने फुलवतात तर काही राजकारणी त्यांच्या तुच्छ कृत्यांनी मराठी वैभवाला लांछन लावतात? का आपल्याला असं वाटत की शिवाजी शेजाऱ्याच्या घरी जन्माला यावा? भारतीय लष्करात कित्येक शूर मराठी सैनिक असताना का २६ नोव्हेंबरला परप्रांतीयांना या मराठी मातीसाठी हौतात्म्य पत्करावे लागते? का?!...
         जेव्हा ताकद आणि बुद्धी यांचा संगम होतो तेव्हा जशा अत्युत्तम गोष्टी घडतात त्याचप्रमाणे नकोते तापदायक फाटेही फुटू शकतात...अनेक बुद्धिमान जेव्हा एकत्र विचार करू लागतात, एकाच कार्यात लक्ष घालू लागतात तेव्हा ते काम बिघडण्याचीच शक्यता जास्त असते; तसे होत असेल कदाचित मराठी माणसाच्या बाबतीत. आजच्या घडीला मराठी माणूस आपली ताकद, बुद्धी काही चुकीच्या व भ्रष्ट माणसांकडे गहाण टाकून आलेला दिसतोय. दुर्दैव हे की ही नतद्रष्ट्र माणसेही मराठीच आहेत!
          आज पुन्हा आपलीच माणसे आपल्याच माणसांना धोका बनली आहेत. आज पुन्हा नको तो इतिहास स्वतःला गिरवायला निघाला आहे, काही शहाणे अजून पुढे जाऊन इतिहास घडवण्याऐवजी बदलायला निघाले आहेत..."रायगडला जेव्हा जाग येते" या नाटकाच्या शेवटी वसंत कानेटकरांचा एक धीरगंभीर आवाज नाट्यगृहात घुमतो, मन हेलकावून टाकतो. ते म्हणतात,
                                  "इतिहासाच्या गालावरुनी जिथे एकदा सुकले ओघळ.
                                  स्त्रवू लागले शतधारांनी... पुन्हा एकदा तिथेच ओघळ;
                                  त्या शतधारा अनामिकाच्या मनी घालती पिंगा,
                                  शिवरायांच्या हृदयांतरीचे... शल्य मला सांगा;
                                                                      शल्य मला सांगा! "