Friday, March 29, 2013

रडू न्हगं रं लेकरा by-- आशित साबळे.


रडू न्हगं रं लेकरा by-- आशित साबळे.


म्या बा शेतमजूर मालक,
काहीतरी करून खाईन...
येका तरी येळची भाकर,
पोटासाठी लई व्हईन...
दुस्काळानं हिंडतो गावागावा,
कुनीतरी तरी घोटभर पानी द्यावा,
कोरड पडली जल्माला,
घसा तरी वला करून परत जाईन...

रडू न्हगं रं लेकरा,
जे डोळ्यात हाय, ते बी सुकून जाईन...
बगा बगा व लेकरू माझं,
चिरकुन घसा कोरडा पडलाय,
डोळ्यातून पानी येईना झालं,
म्हनत आसन तितकं तरी चाटायला व्हईन...

तिकडं म्हनं हजारो लिट्राच्या पिचकाऱ्या उडीवतेत,
कुनीतरी घेऊन चला ना तिकडं,
धर्माच्या नावावर का व्हईना, खोटारडे जमतेत तिकडं,
म्या बी निसर्गानं दिलेलं पानी पिईन...
लाजा वाटान्हात त्यान्ला, हिकडं काय झालंय ते म्हाईत न्हवं का,
वाटलं न्हवतं आमचंच खाऊन आमच्यावरच उलटे व्हतीन...

लय भ्याव वाटतंय गुरांचे सांगाडे बघून,
गावाकडं शिरप्या माझा काय म्हनीन...
जित्ता जातोय का घरला ते बी ठावं न्हाय,
कुनाला म्हाईत आता आमचं काय व्हईन...


- आशित साबळे